' बुलेटवर लावल्या जाणाऱ्या रंगीबेरंगी कापडी पट्ट्यांचा अर्थ काय? समजून घ्या… – InMarathi

बुलेटवर लावल्या जाणाऱ्या रंगीबेरंगी कापडी पट्ट्यांचा अर्थ काय? समजून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मोटारसायकलवर लावलेल्या रंगीबेरंगी कापडी पट्ट्या आपण सर्वांनी कधीना कधी पाहिल्या असतील. या पट्ट्या रॉयल एन्फील्ड बाईकवर अधिक प्रमाणात दिसतात.

सोबतच या पट्ट्यांवर ठळक अक्षरात आपल्याला वाटतं त्या प्रमाणे चिनी किंवा जपानी भाषेतील अक्षरे लिहिलेली असतात. मोटारसायकलवर या पट्ट्या दिसल्या की मनात अनेक प्रश्न उभे राहतात.

या पट्ट्या का लावतात? या अक्षरांमागचा अर्थ काय? की ही फक्त एक फॅशन आहे? इत्यादी इत्यादी…

चला तर आज जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि या पट्ट्यांचे महत्त्व!

 

royal-enfield-inmarathi

या कापडी पट्ट्यांना इंग्रजीमध्ये तिबेटीयन प्रेयर फ्लॅग्ज म्हणतात. मराठीत आपण त्यांना तिबेटी पवित्र प्रार्थना ध्वज म्हणू शकतो. या प्रेयर फ्लॅग्जचा आकार आयताकृती असतो.

हे प्रेयर फ्लॅग्ज दोन प्रकारचे असतात. आडव्या प्रेयर फ्लॅग्जना तिबेटी भाषेत “लुंग ता” असे म्हटले जाते. ज्याचा अर्थ आहे “वायुरूपी घोडा”!

lung-ta-flags-marathipizza

तर उभ्या प्रेयर फ्लॅग्जना तिबेटी भाषेत “डार चोग” म्हटले जाते, ज्याचा अर्थ आहे “पवित्र ध्वज”!

 

Vertical_Tibetan_Prayer_Flags-marathipizza

 

आपण मोटारसायकलवर जे प्रेयर फ्लॅग्ज पाहतो ते “लुंग ता” प्रकारचे असतात. एक गुड लक (शुभ वस्तू) म्हणून या प्रेयर फ्लॅग्जचा वापर केला जातो.

यावर लिहिलेली भाषा ही चिनी किंवा जपानी मुळीच नाही. ती तिबेटी भाषा आहे. या प्रेयर फ्लॅग्जवर जी अक्षरे असतात, तो मुळात तिबेटी भाषेतील आणि बौद्ध धर्मातील एक मंत्र आहे. (बहुतेक प्रेयर फ्लॅग्जवर हीच प्रार्थना आढळून येते.)

त्या मंत्राचे बोल आहेत- ॐ मणिपद्मे हूं!

 

preyer-flags-marathipizza01

या मंत्राचा काही ठराविक अर्थ नाही. पण असे म्हटले जाते की –

शांत चित्ताने मन लावून या मंत्राचा जप केल्यास चित्त थाऱ्यावर येते आणि राग, लोभ, मत्सर, द्वेष यांवर मनुष्य विजय मिळवू शकतो.

या प्रेयर फ्लॅग्ज वर असणारा प्रत्येक रंग सृष्टीतील पाच तत्वांचे प्रतिक आहे. पांढरा रंग वाऱ्याचे, लाल रंग आगीचे, हिरवा रंग पाण्याचे, पिवळा रंग पृथ्वीचे आणि निळा रंग आकाशाचे प्रतिक आहे.

जर तुम्ही कधी नेपाळ, तिबेट, लडाख, लेह, धर्मशाला किंवा हिमायालातील एखाद्या शहरात गेलात जेथे बुद्ध धर्माचा प्रभाव आहे, तर तुम्हाला घराबाहेर, मंदिरांवर उंच जागी तसेच डोंगर माथ्यांवर प्रेयर फ्लॅग्ज वाऱ्यासोबत डौलाने फडकताना आढळतील. ते यासाठीच की –

हे प्रेयर फ्लॅग्ज कधीही स्थिर असू नयेत, तसेच ते कधीही जमिनीवर ठेवले जाऊ नयेत असे तिबेटीयन संस्कृतीमध्ये सांगण्यात येते. म्हणूनच जेथे वाऱ्याचा वेग जास्त असेल त्या जागी हे लावले जातात.

तसेच हिमालयातील बुद्धिस्ट लोक ते ज्या भागात राहतात त्या भागाच्या चारही बाजूना असे प्रेयर फ्लॅग्ज लावून ठेवतात जेणेकरून त्यावर लिहिलेल्या प्रार्थनांचा वाऱ्यासंगे चारी दिशांना प्रसार व्हावा आणि समस्त जगात सुख, शांती नांदावी.

 

lung-ta-flags-marathipizza01

अजून एक रंजक गोष्ट म्हणजे या प्रेयर फ्लॅग्जचा रंग निघून जाणे आणि त्यावरील अक्षरे पुसट होणे हे शुभ मानले जाते.

त्यांचा रंग निघून जाणे आणि अक्षरे पुसट होणे असे दर्शवते की तुमच्या प्रेयर फ्लॅग्जच्या प्रार्थना वाऱ्यासंगे संपूर्ण चारी दिशांना पसरत आहेत आणि या पुण्याचे कामाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल.

हे प्रेयर फ्लॅग्ज विविध आकारात असतात, काही भले मोठे असतात, तर काही मोटारसायकल वर लावलेले असतात तेवढ्या लहान आकाराचे असतात.

lung-ta-flags-marathipizza03

मोटारसायकलस्वर हे प्रेयर फ्लॅग्ज आपल्या मोटारसायकलवर लावतात कारण हे प्रेयर फ्लॅग्ज असे दर्शवतात की हा व्यक्ती प्रचंड मोठ्या पर्वतांमधून लेह-लडाखची आणि पवित्र हिमालयाची यात्रा करून सुखरूपणे परतला आहे.

म्हणजे एकप्रकारे तुम्ही लेह-लडाखच्या प्रवासा दरम्यान घेतलेल्या कष्टांचे ते प्रतिक असते.

असे म्हणतात की लेह-लडाखला जाऊन हे प्रेयर फ्लॅग्ज कमवावे लागतात. पण सध्या संपूर्ण देशभर हे कोठेही मार्केटमध्ये उपलब्ध असल्याकारणाने कोणीही उठसुठ आपल्या मोटारसायकलवर ते लावतो.

आता तर अनेक कारवर देखील ते लावलेले आढळतात. त्यामुळे हळूहळू या प्रेयर फ्लॅग्जचे महत्त्व कमी होत चालले आहे.

 

lung-ta-flags-marathipizza02

लेह-लडाखला जाऊन ते कमवण्यापेक्षा इथूनच ५०-१०० रुपयाला मार्केटमधून उचलून गाड्यांवर लावणे लोकांना सोपे वाटते.

 

Prayer Flags on Bike Inmarathi

 

पण लेह-लडाखला जाऊन फ्लॅग्ज “कमावण्यात” जी धुंदी आहे, ती अश्या फ्लॅग्ज “लावण्यात” कशी असेल?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?